Monday 23 November 2015

Thursday, 9 August 2012

रुग्णालयांनी अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा - डॉ. विजयकुमार गावित


मुंबई, दि. 9 : वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये राज्य शासनाने मनुष्यबळ, पायाभूत सुविधा व उच्च दर्जाची साधन सामुग्रीची तरतूद केली आहे. रुग्णालयांनीही अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काल येथे सांगितले.
            कामा व ऑल्ब्लेस रुग्णालय, मुंबई येथील मुख्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, सेप्टीक ओटी, बाह्यरुग्ण विभाग, लेबर वॉर्ड, सभागृह, हृदयरोग रुग्णवाहिका यांचा लोकार्पण व अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
            डॉ. गावित पुढे म्हणाले राजीव गांधी जीवनदायी योजना अतिशय परिणामकारकरित्या जिल्हयांमध्ये कार्यान्वित झाली असून जे.जे. रुग्णालयातून या योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वाधिक व्यक्ती आहेत.
            वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यावेळी म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली आहे. जास्तीत जास्त चांगली आरोग्य सेवा या योजनेंतर्गत देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील.
जे.जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यावेळी म्हणाले कामा रुग्णालय फक्त महिला व बालकांसाठी आहे तेथे पुरुषांनाही प्रवेश देण्याचा विचार वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत करण्यात यावा. जवळजवळ 40 कोटी रुपयांची यंत्र सामग्री तेथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नजीकच्या काळात कर्करोगावर प्रभावी उपचार करणारे रुग्णालय म्हणून कामा रुग्णालयाची ओळख निर्माण होईल.
 कामा रुग्णालयाच्या अधिक्षक  डॉ. राजश्री डी. कटके यांनी यावेळी रुग्णालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. 1886 पासून कार्यरत असलेल्या या कामा रुग्णालयास 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला 68 खाटा असलेल्या या रुग्णालयात आता 505 खाटा आहेत. आर्थिकदृष्टया दुर्बल अशा सर्व रुग्णांना अद्ययावत कर्करोग उपचार सेवा येथे उपलब्ध होत आहे. विभागीय कर्करोग उपचार केंद्र अशी ओळख या रुग्णालयास मिळावी या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्रीमती कटके यांनी यावेळी सांगितले.
या सोहळयास आमदार श्रीमती ॲनी शेखर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. पी. एच. शिनगारे, नगरसेवक गणेश सानप, डॉक्टर्स, परिचारिका तसेच वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment