Wednesday, 4 November 2015

मायभूमीने दिला पुनर्जन्म!

मुंबई - पोटात वेदनांचा कल्लोळ... प्रत्येक क्षण युगासारखा. जीवघेण्या वेदनांनी विव्हळत एक महिला 40 वर्षांनी येमेनहून भारतमातेच्या कुशीत आली. शेवटचा श्‍वास या मायदेशात घेण्याची इच्छा तिच्या मनात होती. इथल्या भूमीवर पाय ठेवताच तिला आश्‍वासक वाटले. विमानतळावरून ती थेट कामा रुग्णालयात दाखल झाली. डॉक्‍टरांनी तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया केली आणि तिचा पुनर्जन्म झाला!

येमेनमधील डॉक्‍टरांनी केलेल्या अर्धवट शस्त्रक्रियेमुळे गर्भाशयाचा कर्करोग झालेल्या या महिलेच्या पोटात वेदनांचा आगडोंब उसळत होता. कामा रुग्णालयात शस्त्रक्रिया करून गर्भाशय पूर्णपणे काढून टाकण्यात आले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. खुर्शिद सय्यद अहमद अली (वय 62) हिची ही कहाणी आहे. लग्न झाल्यानंतर ती येमेनला गेली होती. तिचे पती हमीद इब्राहिम तिथे हॉटेलमध्ये काम करतात. दोन वर्षांपासून खुर्शिदच्या पोटात दुखत होते आणि अंगावरून जात होते. येमेनमधील सरकारी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गर्भाशयाचा कर्करोग झाल्याने गर्भाशय काढून टाकावे लागणार होते. ही शस्त्रक्रिया इतकी अवघड होती की तेथील डॉक्‍टरांनी ती अर्ध्यावरच सोडून दिली. तिला घरी पाठवले. शस्त्रक्रिया अर्धवट झाली आहे, याची तिला कल्पना देण्यात आली होती. शस्त्रक्रियेमुळे तिचे अंगावरून जाणे थांबले; परंतु तिच्या पोटातील असह्य वेदना बंद होत नव्हत्या. खासगी रुग्णालयात महागडे उपचार करून घेण्याइतकी तिची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. नातेवाईकांनी तिला मुंबईला बोलावले. मुंबईतील कामा रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. "सिटी स्कॅन' केल्यावर येमेनमधील डॉक्‍टरांनी गर्भाशयाचा काही भाग तसाच ठेवल्याचे दिसले. मूत्राशय, आतडी आणि आसपासच्या भागांत तो झाकून गेला होता. त्यामुळे पोटात असह्य वेदना होत होत्या. कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री कटके यांनी ही अवघड शस्त्रक्रिया केली आणि तिच्या वेदना थांबल्या. अंडाशय, फिलोपाईन ट्यूब, गर्भाशयाचा राहिलेला भाग, इतर अनावश्‍यक आणि हानिकारक पेशी आता काढून टाकण्यात आल्या आहेत, असे डॉ. कटके यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतर करण्यात आलेल्या हिस्टोपॅथोलॉजीमध्ये खुर्शिदच्या पोटात आता कर्करोगाचे टिश्‍यू नसल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या जीवाला असलेला धोका टळला आहे, असेही त्यांनी सांगितले. रुग्णाची तीव्र इच्छाशक्ती आणि डॉक्‍टरांवर असलेल्या विश्‍वासामुळेच ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी झाली, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

मैं अभी खुश हूँ! लग्नानंतर 40 वर्षे येमेनमध्ये राहिलेल्या खुर्शिद यांना उपचारांसाठी प्रथमच आपल्या मातृभूमीत यावे लागले. मुंबईत पाय ठेवण्याआधी त्या मानसिकदृष्ट्या दुर्बळ झाल्या होत्या. येमेनमधील युद्धामुळे तेथे जगणेही अशक्‍य झाले आहे. भारतात आले नसते तर जगलेच नसते. हा माझा पुनर्जन्म आहे, असे त्यांनी सांगितले. मी आता खुश आहे, असे म्हणताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

No comments:

Post a Comment