पोटातून काढला तीन किलोचा गोळा
सकाळ वृत्तसेवा
Thursday, February 24, 2011 AT 12:00 AM (IST)
नंदुरबार - येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या विविध रोग निदान शिबिरात आदिवासी महिलेच्या पोटातून तीन किलो वजनाचा गोळा काढण्यात आला. जिल्ह्यात शिबिरासारख्या उपक्रमात प्रथमच "ह्यूज फायब्राईट'ची यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने विशेष समाधान व्यक्त होत आहे. मुंबई येथील कामा हॉस्पिटलच्या सहयोगी प्रा. डॉ. राजश्री कटके यांनी ही शस्त्रक्रिया केली.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, डॉ. हीना गावित यांनी जिल्हा रुग्णालय तसेच जिल्ह्याच्या विविध भागांत सर्व रोग निदान, उपचार शिबिरांचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यात नेत्र, दंत, स्त्रीरोग आदींचे निदान केले जात आहे. यात पोटदुखीने त्रस्त असलेली खर्डी (ता. तळोदा) येथील गुरबाबाई राकेश पाडवी ही शिबिरात दाखल झाली. तिने यापूर्वी अनेक डॉक्टरांना प्रकृती दाखवली होती. परंतु आर्थिक स्थितीअभावी ती पुरेसे उपचार करून घेऊ शकली नाही. या शिबिरात जे. जे. हॉस्पिटलच्या महिला विभाग प्रमुख डॉ. रेखा डावर यांनी तिची तपासणी केली. तिच्या पोटात मोठा गोळा असल्याचे निदान झाले. तिच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला.
गुरबाबाईला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. तिच्यावर मुंबई येथील कामा हॉस्पिटलच्या सहयोगी प्रा. डॉ. राजश्री कटके, डॉ. सचिन नाईकनवरे यांनी नुकतीच शस्त्रक्रिया केली. पोटातून तीन किलोचा ट्यूमर काढण्यात आला. त्यास वैद्यकीय भाषेत "ह्यूज फायब्राईट' असे संबोधण्यात येते.
याबाबत डॉ. कटके यांनी "सकाळ'ला सांगितले, यापूर्वी आपण विविध ठिकाणी शस्त्रक्रिया करून रुग्णांच्या पोटातून पाच आणि आठ किलोचे गोळे काढले आहेत. मात्र या भागात येऊन केलेली शस्त्रक्रिया विशेष समाधान देणारी ठरली आहे. महिलांच्या आरोग्याकडे कुटुंबातून दुर्लक्ष केले जाते. त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महिलांनीच आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. शिबिराच्या माध्यमातून डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित आदिवासींच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, ही समाधानाची बाब आहे.
या शस्त्रक्रियेसाठी मुंबईत 50 हजारांहून अधिक खर्च येतो. येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आदिवासी महिलेला जीवदान मिळाल्याचा आनंद वाटतो
No comments:
Post a Comment